शिशुविहार व बालक मंदिरचे विद्यार्थी रंगले दिंडी सोहळ्यात
शिशुविहार व बालक मंदिरचे विद्यार्थी रंगले दिंडी सोहळ्यात
नाशिक प्रतिनिधी -: भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारी शाळा म्हणजे सी.एच.एम.ई. सोसायटी संचलित शिशुविहार व बालक मंदिर १ वी ते ७वी मराठी माध्यमात बुधवार दिनांक २८/०६/२३ रोजी आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय अभ्यासाबरोबरच विविध सण, उत्सवातून मुलांवर संस्कार करण्यात सतत प्रयत्नशील असलेली आमची शाळा. आषाढी एकादशीनिमित्त मुलांना विविध संतांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या साहित्याची व कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी शालेय समिती अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील उपस्थित होत्या. शालेय समिती अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक यांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सौ. वैशाली गोसावी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. भारतीय संस्कृतीचा वारसा ज्यांनी जपला व पुढील पिढीला मार्गदर्शन केले अशा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांची वेशभूषा करून, तसेच वारकरी बनून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद घेतला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी संतांचे स्वगत व विठ्ठलाची गाणी, अभंग सादर केले, तसेच या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी संत व त्यांचे कार्य यावर एक हस्तलिखित तयार केले. यामुळे शिशुविहार बालक मंदिरच्या प्रांगणात जणू प्रति पंढरपुरच अवतरले.
संपूर्ण वातावरणात विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.